BIG BREAKING NEWS...

श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाला मिळाले यश — इंदिरानगर येथील बंद शाळा पुन्हा सुरू

दि.17,POL, मुरबाड -

इंदिरानगर (धसई) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पटाच्या अभावामुळे बंद झाली होती. मात्र, श्रमजीवी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व आंदोलनामुळे अखेर ही शाळा आज नव्याने सुरू करण्यात आली. या निर्णयामुळे परिसरातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी पंचायत समितीवर श्रमजीवी संघटनेने आंदोलन आयोजित केले होते. या आंदोलनात संघटनेने अनेक प्रश्न उपस्थित करत ठोस भूमिका घेतली होती. इंदिरानगर व चाफे येथील विद्यार्थ्यांची संख्या (पट) पूर्ण असूनही शाळा सुरू केली जात नव्हती. परिणामी, या भागातील लहान मुलांना दररोज दीड ते दोन किलोमीटर अंतर चालत जावे लागत होते. शिक्षण  हक्क धोरणानुसार पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालणे अपेक्षित नाही. मात्र, या धोरणाला धाब्यावर बसवण्यात आले होते.


या अन्यायाविरुद्ध श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत गटशिक्षणाधिकारी पानसरे मॅडम आणि विस्तार अधिकारी यांना जाब विचारला. अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.


आज शाळा सुरू होताना पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी केंद्रप्रमुख घुडे सर, ग्रामपंचायत अधिकारी बांगर मॅडम, श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरज राजपूत, कार्यकर्ते समीर आतार व यशवंत चवर, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश घोलप व भगवान जाधव यांची उपस्थिती होती.


या यशस्वी आंदोलनाबद्दल श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते व नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामस्थांनी संघटनेचे आभार मानत भविष्यातही असेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post