दि.06,BY,POL,मुरबाड-
मुरबाड तालुक्यात गेली पंचवीस वर्षे लेखणीच्या सामर्थ्याने शोषित-पीडितांना न्याय मिळवून देणारे आणि निर्भीड पत्रकारितेचे ध्येय जपणारे पत्रकार संजय रमाकांत बोरगे शोकाकुल झाले आहेत. त्यांच्या वडिलांचे शुक्रवार दि. ५ डिसेंबर रोजी पहाटे वृद्धापकाळाने वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.त्या मुळे बोरगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही वार्ता कळताच मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसन कथोरे यांनी संजय बोरगे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन धीर देत सांत्वन केले.
स्व.रमाकांत बोरगे हे दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि विचारशील व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्या काळात उच्चशिक्षण घेऊन मुंबईसारख्या महानगरात नोकरी मिळवणे हे गौरवाचे मानले जात असताना त्यांनी स्वत:ची ओळख परिश्रम व कर्तृत्वावर उभी केली. नंतर त्यांनी मुरबाड येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेत ग्रामीण भागातही आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले आणि नातवंडांना रशिया येथे वैद्यकीय शिक्षण, इंजिनिअरिंग सारख्या उच्च शिक्षणा साठी प्रोत्साहित केले.त्यांनी मुलगा संजय व मुलगी विद्या यांना फक्त शिक्षणच दिले नाही, तर मानवी मूल्ये, सामाजिक जाण, सत्य आणि न्यायाची भूमिका मनावर खोलवर कोरली. म्हणूनच पत्रकार संजय बोरगे यांनी पुढे सत्यवादी पत्रकारिता करत अनेकांना न्याय मिळवून देणारे कार्य केले याचे श्रेय सर्वस्वी वडिलांच्या संस्कारांना जाते, अशी भावना समाजातून व्यक्त होत आहे.स्व.बोरगे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरील निष्ठेचे नाते अतूट होते. समता, बंधुता, न्याय व प्रगतिशील विचारांचे ते आजीवन वाहक राहिले. त्यांना वाचनाची आयुष्यभर निखळ आवड होती; पुस्तकेच त्यांचे खरे मित्र असे अनेक जण सांगतात.८६ वर्षांच्या वयापर्यंत डोळ्यांची नजर कमी झाली तरीही वाचन थांबवले नाही, ही त्यांच्यावरील ज्ञानप्रेमाची उज्ज्वल साक्ष...
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सामाजिक, राजकीय, पत्रकार, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन आणि फोनवरून संवेदना व्यक्त करत बोरगे कुटुंबाला धीर दिला. शांतिविधी आणि अंत्यसंस्कार मुरबाड येथील स्मशानभूमीत कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडले.एक विचारशील पिढी घडवणारे संस्कारकर्ते, सुसंस्कृत जीवन जगलेले वाचनप्रेमी, न्याय व मानवी मूल्यांचे कट्टर जपणारे —स्व. रमाकांत बोरगे यांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.आपल्या स्मृती प्रेरणा देत राहोत.


Post a Comment