दि.14,BY,POL- कुणाल शेलार -
मुरबाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,शिरोशी येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश राठोड हे मद्यधुंद अवस्थेत रुग्णांना उपचार देत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.हा प्रकार काल दि.13/08/2025 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास श्रमजीवी संघटनेचे सूरज राजपूत,राहुल वाघ,भगवान जाधव आणि केशव शिद यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने मुरबाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीधर बनसोडे यांना याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच सुमारे 3 तासांचा प्रवास करून डॉ.बनसोडे रात्री 1 वाजण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र,शिरोशी येथे दाखल झाले.त्यांनी डॉ. राठोड यांची उपस्थितीत पाहणी करून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डॉक्टरांचा लेखी जबाब घेतला.
आपल्या लिखित जबाबात डॉ.राठोड यांनी स्पष्ट नमूद केले आहे की,"मी ड्युटीवर असताना कधीही मद्यपान करणार नाही, तसेच जर असे पुन्हा आढळल्यास माझ्यावर होणाऱ्या कारवाईस मी जबाबदार राहीन." परंतु पुढील वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सरकारी रुग्णालयात असा प्रकार घडल्याने रुग्णांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तसेच आरोग्य विभागाच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.या घटनेमुळे ग्रामस्थ आणि रुग्णांमध्ये प्रचंड संताप असून, दोषी डॉक्टरांविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. रुग्णांना सुरक्षित, योग्य आणि दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलणे अत्यावश्यक असल्याचे बोलले जात आहे.




Post a Comment