नागपूर : अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात राम लला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे. समाजातील सर्व घटकांना समान अधिकार मिळण्याचा क्षण असल्यामुळे आपण सर्व राम ललाच्या दर्शनाला अयोध्येला जाऊया, असे भावनिक आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अयोध्या येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या गर्भगृहात राम लला विराजमान होणाऱ्या क्षणाच्या साक्षीदार होत असल्याचा अभिमान आहे. हा क्षण रामनगर येथील राम मंदिराच्या परिसरात लावण्यात आलेल्या भव्य स्क्रीनवर बघण्यासाठी श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे आयोजित या कार्यक्रमास सुरेंद्र पांडे, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, शैलेश जोगळेकर, संजय बंगाले, जयप्रकाश गुप्ता, शाम पत्तरकीने, प्रणिता फुके, अश्विनी जिचकार, संदीप गवई आदी उपस्थित होते.


Post a Comment